मंगळवेढा तालुक्यात घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार? सखोल चौकशी व अनुदानाचे हप्ते रोखण्याची मागणी - देवदत्त पवार 

​१ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) इशारा 


​मंगळवेढा (प्रतिनिधी):

मंगळवेढा तालुक्यातील घरकुल योजनांमध्ये कागदोपत्री कामकाज उरकून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घरकुल योजनांची केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष स्थळपाणी करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयित प्रकरणांमधील पुढील अनुदानाचे हप्ते तात्काळ स्थगित करावेत, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


​मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील घरनिकी (गरनिगी) गावातील काही संशयित बोगस लाभार्थ्यांची नावे पुराव्यासहित गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनामध्ये स्पष्टपणे देण्यात आली आहेत. घरकुल मंजूर होण्यापूर्वीच झालेले बांधकाम, जिओ-टॅगिंग (Geo-tagging) मधील तफावत, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि निधी वितरण यांमध्ये मोठे फेरफार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

​निवेदनातील प्रमुख मागण्या व मुद्दे:

​सखोल चौकशी: घरनिकी गावातील बोगस संशयित लाभार्थ्यांसह मागील दोन वर्षांत मंगळवेढा तालुक्यात मंजूर झालेल्या सर्व घरकुल प्रकरणांची गावनिहाय सखोल तपासणी करण्यात यावी.

​जिओ-टॅगिंगची पडताळणी: प्रत्यक्ष घरकुल अस्तित्वात आहे का, जिओ-टॅगिंग योग्य ठिकाणी झाले आहे का, आणि निधीचे हप्ते वितरीत करताना प्रत्यक्ष कामाची काय स्थिती होती, याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून खात्री करावी.

​हप्ते रोखणे व वसुली: चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रकरणांमधील अनुदानाचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात यावेत. गैरप्रकार आढळल्यास अनधिकृतपणे वितरित केलेल्या निधीची वसुली करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.

​१ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन!

प्र प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली नाही, तर ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा देवदत्त रामचंद्र पवार (युवक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार, ता. मंगळवेढा) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, सोलापूर) आणि जिल्हाधिकारी (सोलापूर) यांनाही पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم