राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष देवदत्त पवार आक्रमक; घरकुल गैरव्यवहाराच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घ्यावी
लाभार्थी निवड, निधी वितरण व जिओ-टॅगिंगची सखोल चौकशी करण्याची मागणी; दोषींवर कारवाईची मागणी
मंगळवेढा : तालुक्यातील घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष देवदत्त पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घरकुल योजनेबाबत देण्यात आलेल्या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड योग्य पद्धतीने झाली आहे का, मंजूर घरकुलांना निधी कोणत्या टप्प्यावर आणि किती प्रमाणात वितरित करण्यात आला, प्रत्यक्ष घरकुलांचे बांधकाम झाले आहे का, तसेच जिओ-टॅगिंगची प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली आहे का, याची गावनिहाय तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
घरकुल योजनेचा निधी हा सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी असतो. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अनियमितता असल्यास ती गंभीर बाब असून, प्रशासनाने केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी भूमिका देवदत्त पवार यांनी मांडली आहे.
“घरकुल योजनेतील तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. योजनेत कुठे गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी पवार यांनी केली.
तसेच मंजूर घरकुलांची संख्या, लाभार्थ्यांना वितरित झालेला निधी, निधी वितरणाच्या तारखा, जिओ-टॅगिंगची माहिती आणि प्रत्यक्ष बांधकामाची सद्यस्थिती यांची तपासणी करून संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी न केल्यास पुढील काळात आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा देवदत्त पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या तक्रारीवर कोणती कार्यवाही करते, याकडे मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment