*लिगाडेवाडीत पाण्यासाठी वणवण; विहिरी-बोरवेल कोरडे* .

 *१२०० लोकसंख्येच्या वाडीची तहान भागणार कधी? जाधव वस्ती, शिंदे वस्तीतील नागरिकांचे हाल* 



* प्रतिनिधी सचिन धंडोरे  अजनाळे * :-

सांगोला तालुक्यातील लिगाडेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या वाडीतील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेषतः जाधव वस्ती व शिंदे वस्ती परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



      समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरातील विहिरी व बोरवेल कोरडे पडले आहेत. परिणामी घरातील दैनंदिन          गरजांसाठीही पाणी मिळविताना नागरिकांची दमछाक होत आहे. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दूरवर पायपीट करावी लागत असून, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांनाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.



    पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवावी लागत असल्याचे चित्र लिगाडेवाडीत दिसून येत आहे. एकीकडे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना दुसरीकडे             लिगाडेवाडीतील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



‘निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस; मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठी वणवण’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. लिगाडेवाडीतील पाणीटंचाईची तातडीने दखल घेऊन जाधव वस्ती व शिंदे वस्ती परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.



कोट 

लिगाडेवाडी येथील पिण्याच्या पाण्याबाबत अद्याप ग्रामपंचायतीकडे कोणत्याही नागरिकाकडून अधिकृत मागणी आलेली नाही  नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास शासनस्तरावर टँकरची मागणी करून लिगाडेवाडी येथे पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, 

संदिप सरगर 

ग्रामपंचायत अधिकारी अजनाळे/ लिगाडेवाडी

कोट

लिगाडेवाडी, जाधव वस्ती, शिंदे वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विहिरी व बोरवेल कोरडे पडल्याने दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत. ग्रामपंचायतीने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरू करावा.


अजित शिंदे, ग्रामस्थ ,लिगाडेवाडी

Post a Comment

أحدث أقدم