* म्हैशाळ योजनेचे पाणी घेरडी परिसराला मिळेना; शेतकऱ्यांचे उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा*
*तहसीलदारांकडे परवानगीची मागणी; पाणी न मिळाल्याने शेतकरी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर*
*घेरडी (ता. सांगोला* ) :
म्हैशाळ योजने मधून मौजे घेरडी परिसर तसेच घेरडी-पारे तलावासह अन्य तलाव भरून देण्याची मागणी करूनही अद्याप पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सांगोला तहसीलदारांकडे निवेदन देऊन यापूर्वी स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही घेरडी परिसरातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. परिसरात पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या मागणीसाठी दि. १७ जून २०२६ रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, आश्वासनानंतरही अपेक्षित प्रमाणात पाणी सोडण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
निवेदनात शेतकऱ्यांनी सांगितले आहे की, पाणी उपलब्ध न झाल्यामुळे शेतीचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन घेरडी परिसरातील तलाव व बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे, अन्यथा पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रकरणी सांगोला तहसील कार्यालयाकडे दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन साद करण्यात आले असून, उपोषण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाची परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन या पाणीप्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे घेरडी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق