*तिप्पेहळ्ळी येथे टेंभूचे पाणी नसल्याने ऐन दुष्काळात पाणी टंचाई; १६ ऑक्टोबरला मिरज-पंढरपूर हायवेवर रस्ता रोकोचा इशारा*


*सांगोला (प्रतिनिधी) -*

मौजे तिप्पेहळ्ळी (ता. सांगोला) येथील सांगोलकर वस्ती, शिववस्ती, काटवान वस्ती आणि  या चार वस्त्यांवर गेल्या ९ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेजारूनच टेंभू योजनेची मुख्य पाईपलाईन गेली असतानाही अधिकारी जाणीवपूर्वक पाणी देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


या संदर्भात ग्रामस्थांनी तहसिलदार सांगोला यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, डोंगरालगत गेलेल्या टेंभू पाईपलाईनच्या चेंबरमधून सांगोलकर वस्तीवरील साठवण तलाव भरल्यास दोन्ही वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न कायमचा मिटेल. यासाठी रीतसर पाणी मागणी अर्ज आणि पैसे भरण्याची तयारी असतानाही अधिकारी दखल घेत नाहीत.


ग्रामपंचायतीने जलजीवनमधून दोन वेळा पाईपलाईन टाकूनही आजपर्यंत एक थेंबही पाणी आलेले नाही. त्यामुळे सध्या पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे लोक घरे सोडून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहेत.


*१० दिवसात पाणी न दिल्यास रस्ता रोको*

या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन तलाव भरण्याचे नियोजन न झाल्यास, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरज-पंढरपूर हायवेवर शिववस्ती येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भिमराव इंगोळे, नारायण करांडे व समस्त ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, गटविकास अधिकारी व कार्यकारी अभियंता टेंभू योजना यांना देण्यात आल्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post