*महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार*

*उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन; प्रचार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*


प्रतिनिधी फिरोज मुल्ला 

पुणे : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांनी पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून आणि हर्षदा देशमुख-जाधव यांनी पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून मंगळवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक तसेच शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनातून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



      उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुना क्लब, पुणे येथे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांच्या हस्ते दोन्ही उमेदवारांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.


      यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले, आता आपल्याकडे प्रचारासाठी कमी कालावधी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून दोन्ही उमेदवारांचा प्रभावी प्रचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. या परिस्थितीचा फायदा घेत दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी जीवाचे रान करावे. जयंत आसगावकर हे अनुभवी आणि मुरब्बी उमेदवार आहेत, तर हर्षदा देशमुख यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी मिळाली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली गर्दी ही विजयाची नांदी आहे. शिक्षक, पदवीधर, एमपीएससी विद्यार्थी आणि तरुण मतदारांशी सातत्याने संवाद साधून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असून प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने कामाला लागावे


           आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रचार यंत्रणेचे काटेकोर नियोजन करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी निश्चित करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे.


      आमदार विश्वजीत कदम म्हणाले, सध्याचे वातावरण शासनाच्या विरोधात आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे ताकदीने लढा दिला पाहिजे. आमदार जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांत शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि स्थानिक विकास निधीचा वापर शैक्षणिक संस्थांसाठी करणे, ही त्यांची कामाची वेगळी ओळख आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या रूपाने महाविकास आघाडीला एक सक्षम आणि नवा चेहरा मिळाला आहे. दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करावे.


         शितलदेवी मोहिते-पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच इंडिया आघाडीला अधिक बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.


आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सहा वर्षांपूर्वी महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि शिक्षक बंधू-भगिनींनी मला मोठ्या मताधिक्याने विजयी केले. याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. यंदाही महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील प्रथम पसंतीच्या मतांची पुनरावृत्ती करून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे..


माझ्या सहा वर्षांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. तीन वेळा टप्पावाढ मिळवून देण्यात यश आले असून चौथ्या टप्प्याची घोषणाही झाली आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी आमचा सातत्यपूर्ण लढा सुरू आहे आणि या लढ्यातही आपण नक्कीच यशस्वी होऊ. शाळांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांना आमचा कायम विरोध राहिला आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने भूमिका मांडली आहे. तसेच टीईटी, ज्युनिअर कॉलेज संचमान्यता यांसह शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी आमचा लढा सुरू आहे, असेही आसगावकर यांनी सांगितले.


हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने माझ्यासारख्या नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीत संधी दिली आहे. या संधीचे निश्चितच सोने करून पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्यास मी कटिबद्ध आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही निवडणूक ताकदीने लढवून विजय मिळवू.


    यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पोवार, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार विक्रम सावंत, काँग्रेस कमिटी पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक विशाल तांबे, अंकुश काकडे, किशोर कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

أحدث أقدم