सामाजिक वनीकरण विभागातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी ३१ ऑगस्टला धरणे आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तक्रारीवर २० दिवस उलटूनही कार्यवाही व माहिती न मिळाल्याचा आरोप
सांगली, दि. २५ ऑगस्ट २०२६ : सामाजिक वनीकरण विभागाच्या जत कार्यालयातील विविध कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
सामाजिक वनीकरण, जत कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या विविध कामांबाबत दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत सामाजिक वनीकरण विभाग, सांगली यांच्या माध्यमातून केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रारीत विविध कागदपत्रांच्या तपासणीची मागणी
तक्रारीमध्ये जत येथील संबंधित कामांबाबत Cash Book, बिले, व्हाऊचर्स, BDS, मोजमाप पुस्तिका, जीओ-जिओटी इत्यादी कागदपत्रे तपासून संबंधित नोंदी व पुराव्यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित कामांची प्रत्यक्ष तपासणी करून अनियमितता आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२० दिवस उलटूनही कारवाई नसल्याचा आरोप
तक्रार सादर करून सुमारे २० दिवसांचा कालावधी उलटूनही तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच चौकशी कोणाकडे सोपविण्यात आली, चौकशी झाली का आणि संबंधित अभिलेखांची तपासणी झाली का, याबाबत तक्रारदारांना लेखी माहिती देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वतंत्र चौकशीची मागणी
संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक व स्वतंत्र चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच शासकीय नियमांनुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.


Post a Comment