मंगळवेढा तालुक्यात घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार? सखोल चौकशी व अनुदानाचे हप्ते रोखण्याची मागणी - देवदत्त पवार
१ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) इशारा
मंगळवेढा (प्रतिनिधी):
मंगळवेढा तालुक्यातील घरकुल योजनांमध्ये कागदोपत्री कामकाज उरकून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घरकुल योजनांची केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष स्थळपाणी करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयित प्रकरणांमधील पुढील अनुदानाचे हप्ते तात्काळ स्थगित करावेत, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील घरनिकी (गरनिगी) गावातील काही संशयित बोगस लाभार्थ्यांची नावे पुराव्यासहित गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनामध्ये स्पष्टपणे देण्यात आली आहेत. घरकुल मंजूर होण्यापूर्वीच झालेले बांधकाम, जिओ-टॅगिंग (Geo-tagging) मधील तफावत, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि निधी वितरण यांमध्ये मोठे फेरफार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या व मुद्दे:
सखोल चौकशी: घरनिकी गावातील बोगस संशयित लाभार्थ्यांसह मागील दोन वर्षांत मंगळवेढा तालुक्यात मंजूर झालेल्या सर्व घरकुल प्रकरणांची गावनिहाय सखोल तपासणी करण्यात यावी.
जिओ-टॅगिंगची पडताळणी: प्रत्यक्ष घरकुल अस्तित्वात आहे का, जिओ-टॅगिंग योग्य ठिकाणी झाले आहे का, आणि निधीचे हप्ते वितरीत करताना प्रत्यक्ष कामाची काय स्थिती होती, याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून खात्री करावी.
हप्ते रोखणे व वसुली: चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रकरणांमधील अनुदानाचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात यावेत. गैरप्रकार आढळल्यास अनधिकृतपणे वितरित केलेल्या निधीची वसुली करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.
१ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन!
प्र प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली नाही, तर ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा देवदत्त रामचंद्र पवार (युवक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार, ता. मंगळवेढा) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, सोलापूर) आणि जिल्हाधिकारी (सोलापूर) यांनाही पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आल्या आहेत.


Post a Comment