​✨ *आबासाहेबांची रांगोळी - एक भावनिक क्षण.* ✨

     ​महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पुणे विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या भव्यदिव्य मेळाव्यात एका अफाट कलेने आणि जिवंत प्रतिमेने उपस्थितांचे मन तर जिंकलेच, पण सर्वांना एका अथांग भावनिक प्रवासात घेऊन गेले. राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व, आमचे दैवत भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांची हुबेहूब रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार श्री. नागेश गजभार सर यांनी अत्यंत अप्रतिम रेखाटली.


         ज्या वेळी नजर त्या रांगोळीवर पडली, तेव्हा असं वाटलं जणू खुद्द आबासाहेबच आपल्या समोर उभे आहेत. रांगोळीतील प्रत्येक रेषा, डोळ्यातील तो आपलेपणा आणि चेहऱ्यावरील तो तेजोमय भाव इतके सजीव होते की, हुबेहूब आबासाहेबांचे दर्शन झाले. शिक्षक समिती सांगोला ही नेहमीच आबासाहेबांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वसा प्रामाणिकपणे चालवत आली आहे. ती जिवंत प्रतिमा पाहताच आबासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींचा महापूर आला. आजही तो त्यांच्या प्रेमाचा व पाठीवर ठेवलेला शाबासकीचा हात अत्यंत स्पष्टपणे जाणवतो. एकामागून एक आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यांसमोरून सरकल्या आणि माझ्यासारख्या आबासाहेबांवर मनस्वी प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे आपोआप पाणावले.

​सांगोला तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांची काल अगदी अशीच भावुक आणि मन हेलावणारी अवस्था झाली होती.

​    रांगोळीकार श्री. नागेश गजभार सरांच्या अद्भूत प्रतिभेला सलाम!

गजभार सर केवळ रांगोळी काढत नाहीत, तर ते रंगांच्या माध्यमातून भावनांना जिवंत करतात. आपल्या रांगोळीच्या प्रत्येक टचेने त्यांनी आमच्या दैवताचे रूप एवढ्या ताकदीने आणि मनमोहकतेने साकारले आहे की, त्याला तोड नाही. त्यांच्या या अफाट कलेबद्दल, निस्सीम भक्तीबद्दल आणि प्रचंड मेहनतीबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. आमच्या दैवताला कलेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केल्याबद्दल गजभार सरांचे मनापासून शतशः आभार!

​🙏 आबासाहेबांना त्रिवार विनम्र अभिवादन! 🙏


 श्री.दत्तात्रय शिंदे 

 सरचिटणीस, शिक्षक समिती सांगोला

Post a Comment

أحدث أقدم