*सांगोला तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी*
*मंत्री काजू-बदाम खाण्यात मश्गूल, इकडे शेतकऱ्यांची पिके जळून खाक - शंकर मेटकरी यांचा हल्लाबोल*
*सांगोला (प्रतिनिधी)* -
राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सरकारचे मंत्री मात्र काजू-बदाम खाण्यात मश्गूल आहेत. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, उभी पिके जळून खाक होत आहेत आणि सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त शोधत आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी यांनी केला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या -
१) सांगोला तालुक्यातील सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.
२) तालुक्यातील सर्व गावांमध्ये पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा.
३) पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय निकषानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सवलती मिळवण्यासाठी कार्यवाही करावी.
४) तालुक्यातील जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या चारा साठ्याची माहिती, उपलब्ध प्रमाण व तो किती दिवस पुरेल याची लेखी माहिती सार्वजनिक करावी.
५) तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची तातडीने पाहणी करून त्यांची यादी तयार करावी आणि संबंधित गावांसाठी टँकर अथवा अन्य पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे.
६) नागरिक तसेच पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करावा.
७) तालुक्यातील उपलब्ध पाणीसाठे, विहिरी, तलाव, बंधारे व इतर जलस्रोतांचा आढावा घेऊन आगामी संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करावी.
८) दुष्काळ जाहीर करण्यासाठी केवळ परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची वाट न पाहता पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, चारा उपलब्धता आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा.
९) दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, पशुपालक व ग्रामीण नागरिकांवर होणारा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन शासनाच्या सर्व संबंधित योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना तातडीने मिळवून द्यावा.
शेतकऱ्यांच्या हातातील पिके पूर्णपणे हातातून गेल्यानंतर मदत करण्यापेक्षा संकटाची तीव्रता वाढण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करून वरील मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा शेतकरी व ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना जिल्हा प्रमुख सुभाष भोसले, युवासेना तालुका प्रमुख रघुनाथ गायकवाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष वसमळे, माजी शहरप्रमुख तुषार इंगळे, शिवसेना उपशहरप्रमुख अमर साळुंखे, शाखाप्रमुख समाधान चव्हाण, उपशहरप्रमुख सागर चव्हाण, संतोष येडगे, शाखाप्रमुख सचिन सुरवसे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*मंत्री काजू-बदाम खाण्यात मश्गूल, इकडे शेतकऱ्यांची पिके जळून खाक - शंकर मेटकरी यांचा हल्लाबोल*













Post a Comment