सोनंद येथे तिरट जुगार अड्ड्यावर धाड! १३ जण ताब्यात; रोख रकमेसह मोटारी, दुचाकी, मोबाईल व जुगार साहित्य असा तब्बल ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सांगोला प्रतिनिधी :-
सोनंद (ता. सांगोला) येथील शेती गट क्रमांक १४८ मधील पडीक शेतजमिनीच्या झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या तिरट नावाच्या ५२ पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह विविध कंपन्यांचे मोबाईल, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच जुगाराचे साहित्य असा तब्बल ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांना सोनंद येथील पडीक शेतजमिनीतील झुडपांमध्ये तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित पोलीस पथकाला सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक खासगी वाहनाने सोनंद येथे रवाना झाले. कारवाईपूर्वी दोन पंचांना सोबत घेण्यात आले. त्यानंतर पंचांसह पोलिसांचे पथक जुगार सुरू असल्याची माहिती मिळालेल्या ठिकाणी पोहोचले.
पोलिसांना पाहताच पळापळ
सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी काही जण गोलाकार टेबलाभोवती खुर्च्यांवर बसलेले, तर काही जण जमिनीवर बसून पत्त्यांचा डाव खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले.
पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. काही जणांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून १३ जणांना जागीच ताब्यात घेतले, तर आणखी ५ ते ६ जण झुडपांचा आडोसा घेत पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
१३ जण ताब्यात
या कारवाईत बबन जगन्नाथ काशिद (५०, सोनंद), नितीन दादासो व्हरगर (२७, हटकर मंगेवाडी), संतोष जगन्नाथ मेटकरी (२८, जवळा), अविनाश बळीराम वसमाळे (३९, जत), प्रविण बंडू वाघमारे (२५, नाझरा), जगन्नाथ दादा कांबळे (५०, जत), समीर जाफर मुलाणी (३५, नाझरे), संतोष श्रीकांत लोहार (२८, नाझरा), श्रीकांत श्रीमंत तोडकर (२६, जवळा), राहुल शामराव कोडग (२७, औढी), महेश राजाराम वायदंडे (३०, नाझरे), अमोल राजाराम विभुते (२९, नाझरा) आणि सुकलेंडू प्रयुघ्न कांबळे (४०, कुंभार गल्ली, सांगोला) यांचा समावेश आहे.
जुगार अड्डा चालविणाऱ्यांची माहिती समोर
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडे चौकशी केली असता, धनाजी शिंदे (रा. कुंभारी, ता. जत, जि. सांगली) आणि नाना इंगोले (पूर्ण नाव माहित नसल्याचे नमूद) यांच्यासह अन्य ५ ते ६ अनोळखी व्यक्ती जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या संशयितांचा तसेच पोलिसांना पाहून पसार झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
१ लाख २२ हजार ४२० रुपये रोख
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १ लाख २२ हजार ४२० रुपये रोख रक्कम जप्त केली. याशिवाय विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल हँडसेटही पोलिसांच्या हाती लागले.
जप्त मोबाईलमध्ये अॅपल, सॅमसंग, विवो, ओपो, वनप्लस आदी कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश आहे. काही आरोपींकडून रोख रकमेसह मोबाईल आणि दुचाकी, तर एका आरोपीकडून मोबाईल, रोख रक्कम व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेश
जुगारासाठी आलेल्या व्यक्तींनी वापरलेल्या अनेक वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, होंडा अॅक्टिव्हा, स्प्लेंडर प्लस, होंडा शाईन, होंडा युनिकॉर्न, हिरो एचएफ आणि सीडी डिलक्स आदी वाहनांचा समावेश आहे.
याशिवाय घटनास्थळावरून काही वाहनांची नंबर प्लेट नसल्याचेही जप्तीच्या वर्णनात नमूद करण्यात आले आहे.
५२ पत्ते, टेबल, खुर्च्यांसह साहित्य जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ पत्त्यांचे ताश, पत्त्यांचे डबे, रोख रक्कम ठेवण्यासाठी स्टीलचा डबा, प्लास्टिकच्या खुर्च्या आणि गोलाकार सात कप्पे असलेले टेबल असे जुगाराचे साहित्यही जप्त केले.
एकूण ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल
या संपूर्ण कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, चारचाकी व दुचाकी वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३६ लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्यावर पंच व पोलिसांच्या स्वाक्षरीचे कागदी लेबल लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सोनंद परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे दिसून आले आहे. पसार झालेल्या व्यक्तींचा शोध तसेच जुगार अड्ड्याच्या आर्थिक व्यवहाराबाबत पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) व २(अ) अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

إرسال تعليق