सर्वदूर पावसासाठी मुस्लिम समाज बांधवांचे सामूहिक नमाज पठण संपन्न.
मुस्लिम समाज बांधवांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसह सर्व समाजाच्या कल्याणासाठी केली दुआ.
सांगोला / तालुका प्रतिनिधी.
सांगोला तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असताना सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा, शेती पिकांना जीवदान मिळावे आणि दुष्काळसदृश परिस्थिती दूर व्हावी, या उद्देशाने सांगोला शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कडलास रोड परिसरातील महाविद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावर सामूहिक नमाज पठण व विशेष प्रार्थना करण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमासाठी हाजी.शब्बीर खतीब,हाजी इब्राहिम मुल्ला,मौलाना अब्दुल हाई, हाजी युसुफ मुल्ला ,शौकत खतीब,बशीर तांबोळी, उस्मान इनामदार, नूर काझी,अखिल काझी, रियाज मुजावर, फिरोज खतीब यांच्या सह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरेनुसार विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे पावसासाठी दुआ करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, जनावरांसाठी चारा-पाण्याची समस्या दूर व्हावी तसेच सर्व समाजात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठीही प्रार्थना करण्यात आली.
तालुक्यात अनेक भागांत पावसाअभावी खरीप पिके संकटात सापडली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक नमाज पठणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उपस्थित धर्मगुरूंनी पावसाचे महत्त्व, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकात्मता याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सर्व धर्म आणि समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पाऊस हा संपूर्ण सृष्टीसाठी आवश्यक असल्याने समाजहिताची भावना जपत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप गुरव,गोपनीयचे अमोल वाडकर,पो. हे.कॉ.येडगे, वाघमोडे यांनी चोख बंदोबस्त बजावला तर सदर सामूहिक नमाज पठण यशस्वी करण्यासाठी सोहेल इनामदार,कादिर इनामदार,तोफिक मुजावर,साहिल खतीब,रफिक नदाफ,मोहसीन मुजावर,दिलावर मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट:-
पाऊस हा केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी जीवनदायी आहे.सांगोला तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस पडून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि जनावरे यांचे संकट दूर व्हावे, या उद्देशाने मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून विशेष दुआ केली.






إرسال تعليق