डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; ५ लाख ८१ हजार रुपयांना गंडा.!

रुबी हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेताना सायबर चोरांनी मारला दरोडा; सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सांगोला / तालुका प्रतिनिधी.

रुबी हॉल हॉस्पिटलच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट ऑनलाईन घेण्याच्या बहाण्याने सांगोला येथील एका व्यवसायिकाची तब्बल ५ लाख ८१ हजार ३२२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

 या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला शहरातील एसटी स्टँडसमोरील भोपळे रोड येथील 'अंबिका नोव्हेलटीज' (गिफ्ट हाऊस) चे चालक मन्मथ सिद्धलिंग बिरगे यांच्या हाताला त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखवायचे असल्याने, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता त्यांच्या मुलीने गूगलवरून रुबी हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक शोधला. 

 ​गूगलवर मिळालेल्या '02066455100' या क्रमांकावर फोन केला असता, समोरील व्यक्तीने डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवून देण्यासाठी व्हाट्सअप वर एक लिंक / APK फाईल पाठवली. तसेच पेशंटची माहिती भरून केवळ ५ रुपये भरण्यास सांगितले. मुलगी स्नेहल हिने लिंक ओपन करून माहिती भरली, परंतु ५ रुपयांचे पेमेंट झाले नाही. त्यावेळी भामट्याने "काही हरकत नाही, राहू द्या" असे सांगून फोन कट केला.  ​खात्यातून टप्प्याटप्प्याने ५ लाख ८१ हजार गायब झाले ​त्यानंतर दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.५२ ते दुपारी १२.०० वाजेच्या दरम्यान, तक्रारदारांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या चालू खात्यातून (Current Account) तक्रारदारांच्या संमतीशिवाय अनधिकृतपणे एकूण १३ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे ५ लाख ८१ हजार ३२२ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. 


​मोबाईलवर पैसे कपात झाल्याचे मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बिरगे कुटुंबाच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच माधुरी मनमथ बिरगे (वय ४८, रा.मन्मथ सिद्धलिंग बिरगे, मेन रोड, सिदोबा गल्ली, सांगोला) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.  

​अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल


​माधुरी बिरगे यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध दिशाभूल करून ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post