*एसटी : आजही मनाच्या हळव्या कोपऱ्यात जिवंत असलेली लालपरी.
सांगोला /प्रतिनिधीअक्षय महामुनी
*लहानपणीच्या आठवणींपासून ते आजच्या धावपळीपर्यंत एसटी ही केवळ वाहतूक नाही तर जगण्याचा आधार*
एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही, पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रूपडं तरी किती सुंदर ! लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा, खिडक्यांचा रंग, सीटांचा हिरवा रंग अगदी नऊवारी नेसणाऱ्या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम.
*तिकीटपेटीपासून घंटीपर्यंतचं कुतूहल*
प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीट विकणारा कंडक्टर, त्याची अल्युमिनियमची तिकीटपेटी, पांढरे तिकीटांचे गठ्ठे, तिकीट पंच करण्याचे यंत्र आणि गळ्यात अडकवलेली कातडी बॅग हे सगळं जग लहानपणी अद्भुत वाटायचं. दोन घंट्या दिल्या की एसटी सुरू आणि एक घंटी दिली की एसटी थांबणार म्हणजे थांबणारच ! ती दोरी ओढून घंटी वाजवायला मिळावी हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असायचं.
पूर्वी एसटीला मागच्या बाजूला एकच दरवाजा असायचा. ड्रायव्हरच्या मागे पाच माणसे बसतील अशी मोठी आडवी सीट असायची. गुडघ्यावर बसून जाळीत बोटं अडकवून तासन्तास ड्रायव्हरचं ते मोठं व्हील, अगम्य डॅशबोर्ड आणि दोन फुटाचा विचित्र कोनातला गिअर पाहणं म्हणजे कॉकपीट पाहिल्यासारखं वाटायचं.
*एसटी स्टँड - एक वेगळीच परिसंस्था*
एसटी स्टँड ही एक वेगळीच परिसंस्था ! गर्दी, वेगवेगळे फलाट, स्पीकरवरच्या घोषणा, रसवंतीगृहे, पॉपिन्सच्या गोळ्या, बाहेरून पदार्थ विकणारी मंडळी आणि बुकस्टॉल्स. गाड्या फलाटाला रिव्हर्स लागायच्या. रात्रीचा प्रवास करणारी 'रातराणी' हे नावच भारी वाटायचं.
उन्हातान्हात, पावसापाण्यात, काटाकुट्यात धूळ उडवत धावणारी, एकही प्रवासी नसला तरी वेळेवर निघणारी हक्काची एसटी, शाळेत शिकणाऱ्या मुलांना आईने केलेली भाजी भाकरी मायेने पोचवणारी एसटी, अडनिड्या रस्त्यावर रात्री-अपरात्री आधार वाटणारी एसटी ही केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर आजही अनेकांच्या जगण्याचा मार्ग आहे आणि आधारही आहे. ती जगायला हवी इतकंच.







Post a Comment