*सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे : रघुनाथ गायकवाड, युवा सेना तालुकाप्रमुख (ठाकरे सेना)*


*सांगोला प्रतिनिधी* 

 -* हे राज्य सरकार शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल करत आहे. एकीकडे सरसकट दुष्काळ जाहीर केला असताना पंचनामे कशासाठी करत आहे? असा सवाल युवा सेना तालुकाप्रमुख रघुनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.


या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे संभ्रम अवस्थेत आहे. शेतकऱ्याला काहीच सुचत नाही. एक तर दुष्काळामुळे जनावरे कशी सांभाळायची हा प्रश्न, तर दुसरीकडे या जळीत हंगामासाठी कागदपत्रे गोळा करण्याची व ती ऑनलाईन करून ग्रामपंचायत मध्ये जमा करण्याचे हे धोरण अतिशय चुकीचे असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.


त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास होतोय. एक तर दुष्काळाचा त्रास, पाणी नाही, चारा नाही आणि दुसरीकडून सरकार वन वन फिरायला लावते. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी कधीही सिरीयस नाही.


शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय करणे गरजेचे आहे. एकीकडे मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची पिळवणूक करायची, असे चित्र आहे. शेतकऱ्यांकडे सध्या चारा छावण्या, चारा डेपो किंवा थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला दुष्काळ निधी पाठवणे गरजेचे आहे. परंतु अजून तरी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात येत नाही, ही बाब शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी आहे.


सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु सत्तेत आणि सत्तेच्या बाजूच्या बाकावर बसलेल्या लोकांनी याकडे गांभीर्याने बघून तालुक्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे व सरकारकडून पदरात पाडून शेतकऱ्यांना टेन्शन मुक्त करावे.


हे सरकार अन्नदात्याच्या बाजूने कधी गांभीर्याने उभे राहणार की शेतकऱ्यांना देवाकडे यासाठी साकडे घालावे लागेल, येणारा काळच ठरवेल. परंतु शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. बळीराजा सध्या अतिशय दुःखी वातावरणात जगत आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत रघुनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post