मंगळवेढ्यात महसूल प्रशासनाविरोधात युवासेना शहरप्रमुखांचे आमरण उपोषण नवव्या दिवशीही सुरू; जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विशेष चौकशी समिती नेमण्याची मागणी !...युवा सेना मंगळवेढा शहर प्रमुख अरविंद नाईकवाडी
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा महसूल यंत्रणेतील प्रशासकीय गैरव्यवहार, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई आणि बोगस दस्त नोंदणीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना शहर प्रमुख अरविंद ज्ञानेश्वर नाईकवाडी यांचे बेमुदत धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण आज नवव्या दिवशीही प्रांत कार्यालयाबाहेर तीव्रतेने सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करूनही स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कोणतीही कायदेशीर दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आज ८ सप्टेंबरपासून या आंदोलनाला अत्यंत उग्र व व्यापक स्वरूप देण्याचा कडक इशारा आंदोलकांनी दिला आहे.
महसूल विभागातील भोंगळ कारभाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी अरविंद नाईकवाडी यांचे हे आत्तापर्यंतचे चौथे उपोषण आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय वेळेत अर्थनग्न आंदोलन, थाळीनाद आंदोलन आणि खर्डा-भाकर आंदोलन यांसारखी तीव्र निदर्शने करण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ४ सप्टेंबर रोजीच प्रांत अधिकाऱ्यांना तात्काळ सविस्तर चौकशीचे निर्देश दिले होते. परंतु, स्थानिक प्रांत अधिकारी आणि तहसीलदार स्वतःच दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नाईकवाडी यांनी केला असून, स्थानिक पातळीवर निष्पक्ष चौकशी होणे आता अशक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनाद्वारे अरविंद नाईकवाडी यांनी महसूल प्रशासनासमोर खालील पाच प्रमुख मागण्या पूर्णपणे मांडल्या आहेत:
पहिली मागणी, जन्म-मृत्यू नोंद दप्तरामध्ये बेकायदेशीरपणे फेरफार आणि कागदपत्रांची छेडछाड करून 'महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९' चा भंग करणाऱ्या संबंधित महसूल सहायकाला तातडीने निलंबित करून त्यांच्यावर फसवणुकीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
दुसरी मागणी, जमीन प्रकरणात एकाच विषयात दोन परस्परविरोधी निकाल देऊन लोकांची उघड फसवणूक करणाऱ्या संबंधित मंडळ अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा.
तिसरी मागणी, मौजे मंगळवेढा येथील संशयास्पद दस्त क्रमांक आणि फेरफार क्रमांकाची कायदेशीर चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत या फेरफारला तात्काळ स्थगिती देऊन दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत.
चौथी मागणी, मंगळवेढा तहसील कार्यालयातील प्रदीर्घ स्थानिक कार्यकाळामुळे कार्यालयातील गोपनीय अर्ज, निर्णय व संवेदनशील माहिती बाहेर लीक करणाऱ्या संबंधित शिपायाची 'महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम २००५' नुसार सांगोला तहसील कार्यालयात सेवावर्ग बदली करण्यात यावी.
पाचवी मागणी, नवीन ऑफलाइन अर्जासोबत जोडलेल्या पुराव्यांचा स्वतंत्र विचार करून, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांनुसार प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या कायदेशीर अधिकारात 'महादेव कोळी' जात प्रमाणपत्र ऑफलाइन अर्जावर तात्काळ मंजूर करावे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 'विशेष चौकशी समिती' नियुक्त करण्यात यावी, ज्यामध्ये स्थानिक मंगळवेढा कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश नसेल, अशी आग्रही मागणी नाईकवाडी यांनी केली आहे. उपोषण नवव्या दिवशीही सुरू राहिल्याने उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या काळात उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काही बरे-वाईट झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जिम्मेदारी केवळ आणि केवळ प्रशासनाची राहील, असा इशारा युवासेनेने दिला असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आल्या आहेत.






Post a Comment