*विजेच्या शॉर्टसर्किटने ऊस पिकाला आग; शेतकऱ्याचे सुमारे ५ लाखांचे नुकसान*
सांगोला प्रतिनिधी
सांगोला : तालुक्यातील वाटेगाव येथील शेतात विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकाला आग लागून शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.
अर्जदार अॅड. विजयसिंह भिमराव चव्हाण यांनी दिलेल्या अर्जानुसार, त्यांची वाटेगाव, ता. सांगोला येथील जमीन गट नं. ८३२, क्षेत्र १० हेक्टर९० आर असून त्यापैकी सुमारे १ एकर २६५आर क्षेत्रात ऊस पिकाची लागवड करण्यात आली होती. विहीर बागायत असलेल्या उर्वरित क्षेत्रात ज्वारी, मका, गहू, बाजरी आदी पिके घेतली जातात.
सदर ऊस पीक सध्या सुमारे २२ कांड्यांवर असून चांगल्या स्थितीत होते. मात्र, दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच मोठे स्वरूप धारण केल्याने उभ्या ऊस पिकाचा मोठा भाग जळून खाक झाला.
या आगीत सुमारे अडीच एकर ऊस पीक, तसेच सुमारे ९०० फूट लांबीची पीव्हीसी पाइपलाइन, विद्युत मोटारीची केबल व पाण्याचे चेंबर जळून नुकसान झाल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याने कृषी विभागाकडे अर्ज करून जळालेल्या ऊस पिकाची व शेतीतील इतर नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






إرسال تعليق