*सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून पुरस्कार स्पर्धेचे आयोजन*
*मूर्त्यांकन, सजावट, सामाजिक उपक्रम व पर्यावरण संवर्धनाच्या आधारे उत्कृष्ट मंडळांची निवड*
*सांगोला प्रतिनिधी* .
सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंडळांचे जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत पाहणी व मूर्त्यांकन करून उत्कृष्ट मंडळांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मंडळांचे मूर्त्यांकन कला व सजावट, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य तसेच गणेशोत्सव आयोजनातील विधायकता या प्रमुख निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे.
कला व सजावटीच्या निकषांमध्ये गणेशमूर्ती, आकर्षक देखावे तसेच वाचन, नृत्य, दशावतार, पोवाडा, लावणी, चित्रकला, चित्रपट, नृत्यांगण, पाणी व वृक्षसंवर्धन आदी उपक्रमांचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर पुस्तक मेळावे, अभिवादन कार्यक्रम, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, बालकांसाठी वैचारिक उपक्रम तसेच पारंपरिक वाद्यांच्या स्पर्धांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
सामाजिक कार्याच्या निकषांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम विचारात घेतले जाणार आहेत. आरोग्य, शिक्षण, क्रीडा व विज्ञानविषयक कार्यक्रमांचा समावेश असून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची जनजागृती करणाऱ्या उपक्रमांनाही गुण देण्यात येणार आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पाणी व वृक्षसंवर्धन तसेच प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव आणि स्वच्छतेबाबत जनजागृती यांसारख्या उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
मंडळांचे एकूण १०० गुणांच्या आधारे मूर्त्यांकन करण्यात येणार असून जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्राप्त अर्ज, छायाचित्रे, चलचित्रीकरण व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे उत्कृष्ट मंडळांची निवड करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाच्या पारंपरिक स्वरूपासोबतच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, कला-संस्कृती आणि जनजागृतीपर उपक्रमांना प्राधान्य देऊन या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






Post a Comment