*आधुनिक भारताचे शिल्पकार आणि अर्थक्रांतीचे प्रणेते: डॉ. मनमोहन सिंग*



*.   जयंती विशेष*

*प्रा राजेंद्र ठोंबरे सांगोला*

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात ज्या काही मोजक्या व्यक्तींनी देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक प्रवाहाला एक नवी, क्रांतिकारी दिशा दिली, त्यात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव अत्यंत आदराने व अभिमानाने घेतले जाते. एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ, अभ्यासू सनदी अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, वित्तमंत्री आणि सलग दहा वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ही केवळ उल्लेखनीय नसून ऐतिहासिक ठरली आहे. अत्यंत शांत, संयमी, मितभाषी पण तितकेच दृढनिश्चयी व्यक्तिमत्त्व असलेल्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कर्तृत्वाचा आणि राष्ट्रसेवेचा पट उलगडणे अत्यंत समयोचित ठरले 



डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभाजित भारताच्या पंजाब प्रांतातील 'गाह' या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. बालपणीचा काळ अत्यंत खडतर आणि संघर्षाचा होता. फाळणीच्या भीषण काळात अनेक हालअपेष्टा सहन करत त्यांचे कुटुंब भारतात आले. मात्र, अंगात असलेली जिद्द आणि अभ्यासावरील अढळ श्रद्धेच्या बळावर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. अमृतसर आणि चंदीगड येथून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड या जगातील नामवंत विद्यापीठांमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर व डॉक्टरची पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात मोठ्या पगाराच्या आणि आरामाच्या नोकऱ्या सहज उपलब्ध असतानाही त्यांनी मायदेशी परतण्याचा मार्ग निवडला. देशसेवेची हीच जिद्द त्यांना भविष्यात भारताच्या सर्वोच्च पदांपर्यंत घेऊन गेली.



भारताच्या अर्थव्यवस्थेला जेव्हा जेव्हा गंभीर संकटांनी घेरले, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग हे देशासाठी तारणहार ठरले. १९९० च्या दशकाचा प्रारंभ हा भारतासाठी अत्यंत कठीण काळ होता. देशाची आर्थिक स्थिती ढासळली होती, विदेशी चलनाची साठवण अवघ्या काही दिवसांपुरतीच उरली होती आणि महागाई गगनाला भिडली होती. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर देशाच्या वित्तमंत्रिपदाची धुरा सोपवली. १९९१ चा ऐतिहासिक अर्थसंकल्प हा केवळ एक आकडेमोड करणारा दस्तऐवज नव्हता, तर ती आधुनिक भारताच्या उज्वल भविष्याची नांदी होती.



उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच एलपीजी धोरणाची पायाभरणी करून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची बंद दारे जगासाठी खुली केली. लायसन्स राज संपुष्टात आणून त्यांनी भारतीय उद्योजकांना जागतिक स्पर्धेत उतरण्याचे बळ दिले. या एका निर्णयाने भारताचा आर्थिक विकास दर वेगाने उंचावला आणि देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू लागला.


२००४ मध्ये जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सत्तेवर आली, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे १४ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पुढील दहा वर्षे, म्हणजेच २०१४ पर्यंत त्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या या पंतप्रधानपदाच्या काळात भारताने आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली. राजकीय कोलाहल, युतीचे राजकारण आणि अंतर्गत आव्हाने असूनही त्यांनी नेहमीच देशाच्या आर्थिक हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य दिले. २००८ च्या जागतिक महामंदीच्या काळात जेव्हा जगातील मोठ्या आणि प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मजबूत आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था ताठ मानेने उभी राहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढवण्यात त्यांचे योगदान अनमोल राहिले आहे.


पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेला सर्वात धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय म्हणजे अमेरिका-भारत नागरी अणुकरार. या करारासाठी त्यांनी स्वतःचे सरकार पणाला लावले, विरोधकांचा आणि स्वकीयांचा तीव्र विरोध पत्करला, परंतु देशाच्या दीर्घकालीन ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भारताला जागतिक अणुशक्तींच्या रांगेत सन्मानाने उभे करण्यासाठी ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या कराराने भारताला जागतिक स्तरावर एक जबाबदार आणि प्रगत अणुशक्ती देश म्हणून मान्यता मिळवून दिली. परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात त्यांनी भारताच्या संबंधांना एक नवी आधुनिक दिशा दिली.



डॉ. मनमोहन सिंग यांचे शासन हे केवळ आर्थिक सुधारणांपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी सर्वसामान्य, गरीब आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक ऐतिहासिक कायदे केले.



माहितीचा अधिकार कायदा (आरटीआय) देऊन त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणली आणि सामान्य नागरिकाला ताकद दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) आणून त्यांनी ग्रामीण भागातील लाखो हातांना कामाचा हक्क दिला, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला. 


शिक्षण हक्क कायदा (आरटीई) आणि अन्न सुरक्षा कायदा यांसारख्या क्रांतिकारी निर्णयांमागे डॉ. मनमोहन सिंग यांची दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.



सार्वजनिक जीवनात सर्वोच्च पदावर राहूनही डॉ. मनमोहन सिंग यांनी आपली साधेपणा, नम्रता आणि निष्कलंक प्रतिमा कायम जपत ठेवली. राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यातही त्यांनी कधीही आपली पातळी घसरू दिली नाही. मौन राहून आपले काम करत राहणे आणि वक्तव्यांपेक्षा कर्तृत्वातून उत्तर देणे ही त्यांची कार्यशैली होती. "इतिहास माझ्याबाबतीत अधिक दयाळू आणि उदार निर्णय देईल," हे त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होताना काढलेले उद्गार आजच्या काळात तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्था डॉ. मनमोहन सिंग यांच्या विद्वत्तेचा आणि दूरदृष्टीचा सदैव आदर करत आल्या आहेत.



आज भारत जेव्हा जागतिक स्तरावर एक मोठी आर्थिक ताकद म्हणून उदयास येत आहे, तेव्हा या यशाचा पाया उभारण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी राबवलेली धोरणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला दिलेली गती यांमुळेच आजचा आधुनिक भारत उभा राहू शकला आहे. अशा या थोर मुत्सद्दी, प्रगल्भ अर्थतज्ज्ञ आणि निष्कलंक राष्ट्रपुरुषाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कर्तृत्वाला, राष्ट्रसेवेला आणि त्यागाला संपूर्ण देशाकडून विनम्र अभिवादन. त्यांचे विचार आणि देशसेवेचा वारसा भावी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील.



Post a Comment

أحدث أقدم