*शिंदेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी प्रेमाच्या राख्या
*
अकोला (ता. सांगोला) : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (अकोला), ता. सांगोला, जि. सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा व देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने व प्रेमाने विविध रंगांच्या आकर्षक राख्या स्वतः तयार केल्या.
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातांनी तयार केलेल्या या राख्या पोस्टाद्वारे सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांना पाठविण्यात आल्या आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेम, त्याग, बंधुभाव आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. “राखी हा केवळ धागा नसून, देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र जागणाऱ्या सैनिकांप्रती व्यक्त केलेली प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना आहे,” असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिला.
“चिमुकल्या हातांनी विणली राखीची प्रेमळ वीण,
सीमेवरच्या वीरांसाठी मनापासूनची ही भेट अनमोल!”
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तयार केलेल्या राख्यांमधून ‘चिमुकल्या हातांतून देशभक्तीची सुंदर वीण’ साकारली आहे. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.



Post a Comment