*जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधासह दर्जेदार शिक्षणावर भर देणार - सभापती चेतनसिंह केदार सावंत*
*सोलापूर / प्रतिनिधी :*
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या व दर्जेदार शैक्षणिक वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी एक अत्यंत अभिनव व स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्ह्यात भौतिक सुविधांच्या श्रेणीकरणात 'ड' श्रेणीत असलेल्या ५७१ शाळांचा दर्जा सुधारून 'ड' श्रेणीतील शाळांची संख्या पूर्णपणे शून्यावर आणण्याचे ठाम उद्दिष्ट या उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २,७६८ जिल्हा परिषद शाळांचा सविस्तर आढावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी घेतला होता. या बैठकीदरम्यान 'ड' श्रेणीतील शाळांची श्रेणीवाढ करण्यासाठी अंदाजे ६१ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे समोर आले. ही मोठी गरज लक्षात घेऊन केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता, समाजातील सर्व घटकांना आणि दानशूर व्यक्तींना शाळांच्या विकासाशी जोडण्याचा नवोपक्रम आखण्यात आला आहे.
"शाळांच्या भौतिक सुविधा सुधारल्याशिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शासनाच्या निधीसोबतच समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेऊन 'ड' श्रेणीतील शाळांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर आगामी काळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती घेऊन त्यांचेही वर्गीकरण करण्यात येईल," अशी प्रतिक्रिया सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
*चौकट -*
*माजी विद्यार्थ्यांना जि.प. शाळेशी जोडणार : सभापती चेतनसिंह केदार सावंत*
जि.प. शाळेतून शिक्षण घेऊन आज उच्च पदांवर कार्यरत असलेल्या तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा शाळास्तरीय मेळावा आयोजित करण्याचा विचार आहे. या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या विकासात योगदान देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.






إرسال تعليق